सोमवार, १७ जून, २०१३

जीवनाचा बहार ..... झाडांनी शिकवलेल्या गोष्टी...



दरवर्षी मी मे किंवा जुन महिन्यात आंब्याचं रोप न चुकता लावतेच. यंदा मी ११ मे ला आंब्याचे  चार बाटे (कोय) चार वेगळ्या disposable प्लास्टिक ग्लासेस मध्ये लावले होते. प्लास्टिक मध्ये अशासाठी कि झाड मोठ झालं कि  ते प्लास्टिक फाडून स्वतंत्रपणे झाडाच मुळ न दुखावता झाडांना मोकळ्या जागेत लावता येईल.रोज नियमितपणे त्यांना पाणी घातलं. १२ जून म्हणजे चार दिवसापूर्वी त्या चारपैकी एका बाटे तून कोंब आला आणि झपाट्याने वाढू लागलाय.


पाच दिवसात तो अक्षरशः तळहाताएवढा मोठा झालाय. दरम्यान परवा बघितलं तर अजून एका बाटेतून कोंब फुटायला सुरुवात झाली होती. आणि दोन दिवसात कोंब फुटला आणि तो आकाशकडे बघत बाटेतून वर आला. अजून दोन कोयरीमधून कोंब यायचे आहेत.


झाडाला वाढताना बघणं ही एक खूप सुंदर गोष्ट आहे. आणि त्यासारखा आपल्याला जीवनाची जाणीव करून देणारा दुसरा आनंद देखील नाही असं मला वाटतं. जीवन किती सुंदर आहे. निसर्ग आपल काम अविरत करतच असतो.उन्हाळा आला कि आंबे येतात,पावसाळ्यात पालवी फुटते,सर्वत्र हिरवळ पसरते,बी रुजवली  कि झाड येत, ते झाडही २४ तास वाढत असत, झाडांना कळी येते,या कळीचं फुलात रुपांतर होतं.आणि हे सतत चालूच असत. या झाडांकडे आणि त्यांच्या वाढीकडे बघून मला नेहमी अंतर्मुख ह्यायला होतं. कुठेतरी प्रत्यक्षपणे मी त्या झाडांना माझ्या जीवनाशी जोडू शकते. ते जे शिकवतात ते खूप अनमोल असत.दर वेळी हा अनुभव लिहून ठेवायचा ठरवते आणि राहून जातं आज मात्र लिहायला बसली.

त्या वाढत्या झाडांकडे बघून मनात असे विचार आले कि...
१) पहिला पाऊल उचललं पाहिजे.प्रयत्न केला पाहिजे, मेहेनत केली पाहिजे आणि कोणतीही गोष्ट करताना   त्यात सातत्य पाहिजे.
    माती घालून बी रोवलं तेंव्हा पहिलं पाऊल उचललं गेलं.फक्त बी पेरून झालं नसतं तर झाड येण्यासाठी त्याला रोज पाणी घालावं लागलं ...म्हणजे त्यागोष्टीच सातत्य आलं. 

२) प्रतीक्षा करण, संयम 
पहिल्या बाटेतून कोंब फुटायला एक महिन्याहून जास्त कालावधी गेला. म्हणजे बी पेरल्यानंतर प्रतीक्षा करण हेच हातात होत. तो कोंब बघायला खूप संयम ठेवायला लागला.

३) सकारात्मक दृष्टीकोन 
त्या पेरलेल्या बी मधून झाड येणार हा सकारात्मक दृष्टीकोन आधीच ठेऊन त्या प्रमाणे कृती केली होती. सकारात्मक दृष्टीकोन जीवनात कोणतीही गोष्ट करताना ठेवलाच पाहिजे मगचं ती गोष्ट आपल्या मनासारखी होते.

४) निसर्गचक्र अविरत कार्यव्रत आहे.आणि ते कोणासाठीही थाबत नाही.
जुनी पिकलेली पानं पडतात नवी पालवी येते. ठरलेल्या वेळेप्रमाणे डिसेंबर-जानेवारी-फेब्रुवारीत मोहोर येतो.मोहोर बहारल्यावर कैऱ्या लागतात आणि कैऱ्या पिकल्यावर त्याचं आंब्यात रुपांतर होत.आणि आंब्यातली बाट रुजावल्यावर परत रोप येतं.

५) सगळ्याच बियांची रोपं होत नाहीत आणि सगळीच रोपं वृक्ष होत नाहीत.
असेतर किती तरी बिया असतात पण प्रत्येक बी रुजवली जात नाही आणि रुजलेली प्रत्येक बी वृक्ष होतेच असा नाही. म्हणजे इथेही कदाचित luck असाव प्रत्येक बी चं.  :-) तरीही जे वृक्ष होतात ते सगळ्याची गरज पूर्ण करण्या इतके पुरेसे असतात.निसर्गात कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही.अगदी भरभरून देतो तो आपल्याला.

६) जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो.
त्या कोंब ला बाट्याच टणक आवरण तोडून बाहेर याव लागलं. म्हणजे जीवनासाठी संघर्ष करावा लागला. संघर्षा शिवाय जीवन नाही.

७) आपल्याला आपल्या स्वतःसाठी जागा बनवावी लागते आणि बनवलेली जागा टिकवावी लागते. 
डार्विनने सिद्धांतात सांगितले होते survival ऑफ fittest.शक्तिशाली नाही पण जो मजबूत असतो तोच तग धरतो. ज्या दोन बाटांतून कोंब नाही आले त्यापेकी एका मध्ये खूप छान तुळशीच झाड आलंय.तुळशीच झाडपण खूप छान बहरलय. आता जेंव्हा कोंब येईल तेंव्हा त्याला टिकण्यासाठी या तुळशीच्या झाडाशी संघर्ष करावा लागेल.

८) निर्मोही वृत्ती आणि त्याग
मला वाटतं कि हा गुण खूप शिकण्यासारखा आहे. झाडं फळ देताना सर्वांना देतात ते हे नाही बघत कि समोरची व्यक्ती कशी आहे आणि त्याबदल्यात त्यांना काय मिळणार आहे. त्याग करणारी वृत्ती देखील त्यांच्या कडूनच शिकायला मिळत.

९) आनंद आणि शांती ही आपल्या स्वतःतच आहे ,बाहेर नाही.
कोंब कोयरीतून बाहेर आला. यात मला प्रचंड आश्चर्य वाटतं निसर्गाचं. यात मला कुठे तरी असं वाटलं कि सर्वोत्कृष्ट जे पण काही असत ते आपल्या आत असत पण आपण नेहमी ते बाहेर शोधण्यात वेळ  घालवतो.
आनंद हा बाहेर नाही किंवा कोणावर अवलंबूनपण नसतो तर आपल्या मनावर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असतो. शांती पण बाहेर शोधून नाही मिळत तर शांती आपल्यात असते.आपण गोष्टींना कसे बघतो किंवा स्वीकारतो यावर आनंद आणि शांती हे अवलंबून असतात.  

एकंदरीतच झाड लावणं, ते मोठं होताना बघणं आणि त्याची काळजी घेणं हे खूप छान आहे. आणि एक वेगळाच आनंद मिळतो यातून. मला असा वाटतं कि मला यातून जगायची प्रेरणा मिळते.

1 टिप्पणी: